धनानी इंजिनिअरिंगच्या धनानी हिरोला पर्यावरण विभागाने ठोकले टाळे; बेकायदेशीर व प्रदूषित उद्योग
प्रमोद तिवारी /पालघर
बोईसर – औद्योगिक विकास महामंडळाकडून ठरवून दिलेल्या नियमानुसार वापरात नसलेल्या कारखान्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हेमंत शाळूंके यांनी प्रादेशिक अधिकारी कार्यालयात दाखल केलेली असून एक वर्ष का होईना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तशी दखल घेण्यात आलेली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने आहेत जे औद्योगिक विकास महामंडळाकडून ठरवून दिलेल्या नियमानुसार वापरात आणत नसून उद्योगासाठी परवानगी असताना प्रमाणापेक्षा जास्त वाणिज्य वापर करणाऱ्या कारखाना पैकी धनानी इंजिनिअरिंग वर्क या उद्योगाला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ठाणे कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस यांनी टाळे बंद आदेश दिले आहेत. दिनांक १५ मे २०२४ रोजी टाळेबंदीचे आदेश देण्यात आलेले असून हेमंत शाळूंके यांनी दिनांक २ मार्च २३ व १३ मार्च २०२३ तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक अधिकारी तारापूर १ या कार्यालयातून प्रादेशिक अधिकारी ठाणे यांना अहवाल सादर करण्यात आला होता.
सदर कारखान्याला औद्योगिक विकास महामंडळाकडून इंजिनियरिंग वापरासाठी भूखंड वाटप करण्यात आलेला असून प्रत्यक्षात मात्र दुचाकी वाहनांची विक्री तसेच त्या दुचाकी वाहनांची दुरूस्ती करून वॉशिंग करण्यात येत होती. धनानी इंजिनिअरिंग वर्क या उद्योगाला गाडीचे साहित्य तयार करण्यासाठी तात्कालीन उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी दिनांक १५ मे २०१९ रोजी कसेंट देण्यात आली होती सदर कसेंट दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत कार्यरत असताना कसेंटचा बेकायदेशीर वापर केल्यामुळे सदर उद्योगाला टाळे बंद आदेश देण्यात आलेले असून महावितरण कंपनीकडून वीज जोडणी तर औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी जोडणी कट करण्यात आलेली आहे. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कसेंट देताना भूखंड कुठल्या वापरासाठी वाटप करण्यात आलेला आहे तसेच सदर उध्योगात कसेंट नुसार वापर केला जात आहे का तर बेकायदेशीर वापर सुरू असलेल्या उध्योगाला टाळेबंदी करण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे उपप्रादेशिक अधिकारी तारापूर व झोनल अधिकारी तसेच प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्यात तारतम्य नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे तर एक वर्षानंतर का होईना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आलेली असताना औद्योगिक विकास महामंडळाकडून कारवाई कधी केली जाणार आहे.