• Thu. Oct 10th, 2024

जितेंद्र आव्हाडांकडून महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन, श्लोक अभ्यासक्रमात घ्यायला विरोध; वातावरण तापलं

ByPolitical Views

May 29, 2024



जितेंद्र आव्हाडांकडून महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन, श्लोक अभ्यासक्रमात घ्यायला विरोध; वातावरण तापलं

योगेश पांडे / वार्ताहर 

महाड – शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये दाखल झाले आहेत. मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. त्यासाठीच आज (बुधवार) दुपारी ते महाडमध्ये दाखल झाले आणि चवदार तळ्याजवळ त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. चवदार तळ्याजवळ जाण्यापूर्वी आव्हाड यांनी टिपणीसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा, अशी शिफारस केली आहे. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीची श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेडकडून मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्यास विरोध केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता. तरअजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.

यापूर्वी १९२७ साली याच ठिकाणी महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला विरोध करत, त्यातील विचारसरणीला विरोध दर्शवत मनुस्मृतीचे दहन केले होते. त्याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनस्मृतीचे दहन केले आहे. मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वी जितेंंद्र आव्हाड यांनी टिपणीसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर मनुस्मृतीतील काही भागांचं वाचनही आव्हाडांनी करून दाखवलं. चवदार तळ्याचे आंदोलन, मनुस्मृती दहन हे सगळे तेंव्हाच्या पुरोगाम्यांनी केला आहे. नोटीसींना घाबरणारे आम्ही नाहीत. केसरकरांची बुध्दी आंबेडकरांपेक्षा जास्ता आहे का? जर मनुस्मृतीतील दोन श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असतील तर हळूहळू मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार नाही का ? असा सवालही आव्हाड यांनी विचारला.

एवढंच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृतीतीच्या समावेश होण्याच्या मुद्यावरती अजित पवार आता राजीनामा देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मनु महाराष्ट्रात येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान मिलिंद टिपणीस यांनीही प्रतिक्रिया दिली. जगातील सर्वात हिणकस प्रकार म्हणजे मनुवाद्यांनी चवदार तळे शुध्दीकरण केले. चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून बाबासाहेबांनी ते तळे लोकांसाठी खुले केले आहे. सुकाणु समीतीचा अध्यक्ष कोण आहे ? तुम्हाला मनुच का लागतो ? तुम्ही जर सुधारणावादी आहेत तर मग तुकारामाचे अभंग का घेत नाहीत? आपली मुले मनुच्या संस्कारात वाढणार आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, एससीईआरटीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर आक्षेप व सूचनाही मागणवण्यात आला. या मु्द्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि त्यांनी अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला कडाडून विरोध दर्शवला. २९ तारखेला ( आज ) महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आव्हान आव्हाड यांनी केलं होतं. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, तीच मनुस्मृती हे सरकार पुन्हा आणायचा प्रयत्न करत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला पाहिजे, अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा जाऊन आपण त्याचं दहन करून सरकारचा निषेध करणार आहोत, असं आव्हाड यांनी जाहीर केलं होतं.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें