हवं तर मला फाशी द्या, पण मी मनुस्मृतीला विरोध करणारच; आव्हाडांनी भाजपला सुनावलं
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केलं. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्यानं वाद निर्माण झाला. या वादानंतर आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतरही भाजपकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं. तसंच मला फाशी द्या अशा शब्दात संताप व्यक्त केला. मला फाशी द्या, मी मनुस्मृती आणि मनुवादी सनातनी प्रवृत्तीचा विरोध करतच राहणार असं आव्हाड म्हणाले. भाजपा हा माझा वैचारिक शत्रू आहे. मनू स्मृती आणि धर्म जाती पातीच्या राजकारणावरुन माझे भाजपाशी वैमनस्य आहे. मनु मला मान्य नाही. माझ्या हातून जे घडले त्यावंर मी माफी मागितली. कोशियारींनी माफी मागितली होती का? ज्योतीबा फुले यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या बद्दल.चंद्रकांत पाटलांनी छ. शिवाजी महाराजांवर बोलले होते तेव्हा त्यांनी माफी मागितली होती का? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारले.
मला फाशी द्या. मी सनातनी आणि मनु वादाच्या विरोधात उभा राहणार. स्त्रीचा अनादर मनुस्मृती करतात. छगन भुजबळ यांनी माझी पाठराखण केली याचा मला आनंद आहे. दलित समाजातले अनेक नेते माझ्या बद्दल चांगले बोलले. ९७ वर्षांनंतर त्या स्थळी मनुस्मृती जाळली गेली. आमच्यावर गुन्हे दाखल झालेत. आम्ही आणखी मनुस्मृती जाळणार. माझ्यावर आरोप करत, आंदोलन करत मनु लपवला जातोय. मला तुरुंगात टाका फाशी द्या. माझा काय कोणी खुन करणार आहे का? असाही संतापजनक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याने पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला. किरण शिखरे असं या कार्यकर्त्याचं नाव आह. नॅशनल जनरल सेक्रेटरी असणाऱ्या किरण शिखरे यांच्याबद्दल सांगताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नॅशनल जनरल सेक्रेटरी किरण शिखरे यांना जबरदस्ती एनसीपी अजित पवार गटाच्या कार्यालयात घेवून जबरदस्तीने प्रवेश करुन घेतला. आज ते पुन्हा माझ्याकडे आलेत. त्या प्रकरणात काय झाले याची सविस्तर माहिती दिली. आमच्या कार्यकर्तीला बेदम मारहाण केलीय. तिच्या अंगावरचं सोनं चोरलं असाही आरोप आव्हाडांनी केला.