भाजपचा मनसेला धक्का! कोकणातून डावखरेंना उमेदवारी जाहीर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, लोकसभेसाठी महायुती म्हणून एकत्र लढणारे तीन पक्ष आता या निवडणुकीत समोरासमोर आले आहेत. इथे महायुतीतील तीन पक्षांमध्ये सामना रंगणार आहे. मनसेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार जाहीर करुन टाकला. शिवसेनेनं संजय मोरे यांना उमेदवारी दिली. यामुळे कोकणात शिवसेना, भाजप आणि मनसे या महायुतीमधील तीन पक्षात लढत होणार आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार यांना उमेदवारी दिली आहे. किरण शेलार यांचा सामना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी होणार आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाने संधी दिली आहे. लोकसभेत भाजपला पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपाची कोंडी झाली होती. मात्र, आता भाजपने मनसेला धक्का देत कोकण पदवीधर मतदारसंघाच निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे.