भाजपच्या घोळामुळे यवतमाळ, नाशिक, दक्षिण मुंबई व हिंगोली या चारही जागा गेल्या – शिंदे गट
भाजपच्या हस्तक्षेपावर शिंदे गटाची नाराजी; निकालानंतर पक्ष नेते आक्रमक
योगेश पांडे – वार्ताहर
ठाणे – महायुतीच्या जागावाटपाचे गणित ठरविताना उमेदवारांच्या निवडीपासून काही प्रतिष्ठेच्या जागेवर अखेरपर्यंत घासाघीस झाल्याने किमान चार जागांवर थेट फटका बसल्याचा निष्कर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने काढला आहे. यवतमाळ, नाशिक, दक्षिण मुंबई आणि हिंगोली या चार जागांवर उमेदवारांची निवड करताना भाजपने हस्तक्षेप केल्याचा सूर शिंदे सेनेत उमटू लागला आहे. विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना भाजपकडून येणाऱ्या सर्वेक्षणाचा हट्ट पुरवू नका अशी मागणीच शिंदे सेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे समजते. भाजपने घोळ घातला नसता तर या चारही जागा निवडून येण्याची शक्यता होती असाही सूर पक्षात उमटत आहे. भाजपला २८ जागा लढवून नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे. या उलट शिंदे सेनेने १५ जागा लढवून सात जागांवर विजय मिळविला आहे. जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन आकडी जागाही दिल्या जाणार नाहीत अशी चर्चा माध्यमांत सुरू झाली होती. ही चर्चा घडविण्यामागे कोणाची कुजबुज फळी कार्यरत होती याविषयी आता शिंदे सेनेत उघडपणे प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच, शिंदे सेनेतील काही आमदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत भाजपच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. रामटेक, हिंगोली आणि यवतमाळ- वाशिम या तीन जागांवर भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलण्याची वेळ शिंदे सेनेवर आल्याची बोलले जाते. भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात येऊ नये या भाजपच्या आग्रहापुढे आम्हाला मान तुकवावी लागली ही आमची मोठी चूक होती अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेतील एका नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी खुद्द मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केली होती. मात्र, या जागेवरून अखेरपर्यंत मुख्यमंत्री आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती.
दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांना रिंगणात उतरवावे यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते. मात्र, येथून मराठी उमेदवारच रिंगणात असावा यासाठी भाजपने आग्रह धरल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आपल्या पक्षात होणारा भाजपचा हा हस्तक्षेप थांबवा आणि किमान ५० जागांवरील उमेदवार निवडीचे सर्वाधिकार आपल्याकडेच राखून ठेवावे असा आग्रह देखील काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे धरल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या जय-पराजयाचे योग्य विश्लेषण पक्षात सुरू आहे. आम्हाला अधिकच्या जागा जिंकण्याची चांगली संधी होती हे मात्र निश्चित. काही गोष्टी टाळता आल्या असत्या.