मुंबईतील भाजपचे ‘ते’ आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. हा आकडा पाच-सहा कशालाच १६ किंवा अगदी ४० देखील असू शकतो, असे खळबळजनक वक्तव्य ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केले. शिंदे गटासोबत भाजप पक्षातील आमदारही अस्वस्थ झाले आहेत. हे सर्वजण भविष्यात वेगळा विचार करु शकतात, असे सचिन अहिर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊन लोकसभेत हा परफॉमर्न्स असेल, तर विधानसभा निवडणुकीत नेमका कोणाचा चेहरा घेऊन पुढे जायचे, हा प्रश्न सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना बसला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विचार पुढे नेत असल्याचे सांगितले. पण लोकांनी त्यांना नाकारले. अशा परिस्थितीत निव्वळ शिंदे गटातील नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही त्यांच्या मूळ पक्षाच्या संपर्कात आहेत. एवढेच कशाला भाजपचेही आमदार लोकसभा निकालांनी अस्वस्थ झाले आहेत. मुंबईतील भाजपचे सहा आमदार मागे पडले आहेत, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचा विचार करावा लागेल. यापैकी दोन-तीन आमदार मूळ भाजपचे कधीच नव्हते. कोणी मनसेतून आले आहे, कोणी मराठा संघातून आले आहे. हे आमदारही भविष्यात भाजपसोबत राहण्याबाबत विचार करतील. हे आमदार सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.
शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असण्याचा प्रयोग काही आज झालेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळीही त्यांनी अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न केले. पण आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे बंद ठेवले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांसोबत पक्ष घेऊन पुढे जाणे, ही आमची भूमिका आहे. आमच्या पक्षातील छोट्या कार्यकर्त्यांना आमदार करण्याची धमक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमध्ये आहे. ज्यांनी आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली, पक्ष संपवण्याच्या काळात जे आमच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, ते नेते आणि कार्यकर्ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कुठलीही रसद नसताना, चहा-नाश्ता मिळत नसताना या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला, ते आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. शिवसेना पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही टोकाची प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशाच आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.