भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर कडून मुख्यमंत्र्यांना शिफारस, पत्र व्हायरल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारस केल्याचं समोर आलं असून त्यांचं पत्र आता व्हायरल होत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी आमदाराचने मु्ख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिफारस केल्याची बाब समोर आली आहे. आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी सोमेश शिंदे यांची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. पालिकेच्या अंधेरी के, पश्चिम कार्यालयातील निलंबित दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांची बदली रद्द करण्यासाठी भारती लव्हेकर यांनी शिफारस पत्र दिल्याचं समोर आलं आहे. वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना सोमेश शिंदे यांचे बदली रद्द करण्यासाठी पत्र लिहिले होते. गेल्या वर्षी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सोमेश शिंदे यांची नियमानुसार बदली करण्यात आली होती. यानंतर आमदार लव्हेकर यांनी सोमेश शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बदली रोखण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर सोमेश शिंदे यांना पुन्हा अंधेरी पालिकेच्या के/पश्चिम कार्यालयात दुय्यम अभियंता म्हणून मुदतवाढ मिळाली होती.
सोमेश शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले आहेत. सोमेश शिंदे यांच्या काळात वर्सोवा समुद्रकिनारी शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकाम झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी निष्कासन कारवाई न करणाऱ्या दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. ३ जून रोजी वर्सोवा समुद्रकिनारी भागात निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली होती. निष्कासन कारवाई सुरू असताना ते गाडीत बसून होते, याशिवाय कारवाई पूर्ण होण्याआधीच ते तिथून निधून गेले. कारवाई पूर्ण होईपर्यंत सह आयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान हे कारवाई ठिकाणी थांबून असताना दुय्यम अभियंता सोमेश शिंदे मात्र निघून गेले. ५ जूनच्या पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बोलावलेल्या बैठकीत देखील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांनी दांडी मारली होती. या नंतर दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करून सोबत पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. वेसावेतील अनधिकृत बांधकामे निष्कासन कारवाईसाठी नवीन विशेष पथकाची नियुक्ती पालिका आयुक्तांनी केली आहे. कामकाजातील निष्काळजी, बेजबाबदारपणा मुळीच खपवून घेतला जाणार नाही, असं म्हणेत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा अप्रत्यक्षपणे इशारा देखील दिला आहे.