बारामतीच्या पराभवानंतरही अखेर सुनेत्रा पवार खासदार! राज्यसभेवर बिनविरोध निवड
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राकांपा) वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नाही. पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व सर्व पक्षातील नेत्यांचेआभार मानते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. सुनेत्रा पवार म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने अजित पवार, कार्याध्यक्ष,कार्यकर्ते यांचे आभार मानते. दिलेल्या संधीचे सोनं करेल. लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली होती. या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे. त्यांचे मी आभार मानते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे आणि बाबा सिद्दिकी इच्छुक होते. मात्र आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आलीय. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नाराजीविषयी सुनेत्रा पवारांना विचारले असता त्या म्हणाल्या, माझा उमेदवारीबाबत कोणतीही नाराजी दिसलेली नाही. भुजबळ देखील पक्षातर्फे फॉर्म भरताना उपस्थित होते. त्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि आमदार नरहरी झिरवळ उपस्थित होते. मात्र, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सत्ताधारी महायुतीमधील अन्य कोणताही नेता उपस्थित नसल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.