• Mon. Mar 17th, 2025

शिंदे गटातील अस्वस्थता आली समोर; महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर

ByPolitical Views

Jun 20, 2024



शिंदे गटातील अस्वस्थता आली समोर; महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर

विधानसभेच्या १०० जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर २८८ जागा लढू – रामदास कदम

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – शिवसेनेच्या वर्धापनदिनी जागावाटपावरून पक्षप्रमुखांसमोर भाजपला सुनावल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला विधानसभेच्या १०० जागा हव्या आहेत, जर दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर २८८ जागा लढू, असे म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाला निर्वाणीचा इशाराच दिला आहे. उद्धव ठाकरे लोकसभेला २१ जागा लढले मग भाजपने आम्हाला २१ जागा का दिल्या नाहीत? याचे उत्तर भाजपकडे आहे काय? असा खडा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. यानिमित्ताने शिंदे गटातील अस्वस्थता समोर आली असून महायुतीमधील बेबनाव देखील चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर मेळाव्याचे आयोजन वरळी येथील एनएससीआय डोममध्ये करण्यात आले होते. यावेळी रामदास कदम यांनी केलेल्या भाषणात भाजपने लोकसभा निवडणुकांत सर्व्हेवरून दाखविलेली भीती तसेच लोकसभेचे जागा वाटप अशा मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेऊन भाजपला जोरदार लक्ष्य केले. गुरूवारीही त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन विविध माध्यमांना मुलाखती देताना जागा वाटपावरून भाजपला थेट स्वबळाचे इशारे दिले.

मागील विधानसभेला शिवसेनेने १०० हून अधिक जागा लढल्या होत्या. आता किमान १०० जागा आम्हाला हव्या आहेत, त्या आमच्या हक्काच्या आहेत. जर द्यायच्या नसतील तर मग सगळ्या आमच्याच असतील. आम्ही स्वबळावर लढू. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे लोकसभेला २१ जागा लढले मग भाजपने आम्हाला २१ जागा का दिल्या नाहीत? याचे उत्तर भाजपकडे आहे काय? असा सवालही यावेळी रामदास कदम यांनी विचारला. त्याचवेळी तुम्ही आम्हाला भाऊ म्हणता मग आपण मिळून खाऊ ना, तुम्हाला अडचण काय आहे? असेही रामदास कदम यांनी विचारले. रामदास कदम यांनी जागा वाटपावरून केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून त्याच्यावर अधिक बोलण्यासारखे काहीही नाही. कारण किती जागा देणार, कोणत्या जागा देणार हे प्रसारमाध्यमांद्वारे ठरत नसते. चर्चेला बसल्यानंतर देवाणघेवाण होत असते, त्यानुसार पुढील निर्णय होतील. जागा वाटपाची चर्चा महायुतीमधील प्रमुख नेते करतील. महायुतीच्या समन्वय समितीच्या सदस्याने जरी काही मत व्यक्त केले असते तर मी त्यावर प्रतिक्रिया दिली असती, असे सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रामदास कदम यांच्या म्हणण्याकडे साफ कानाडोळा केला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें