भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं, अजित पवारांबाबत तेच होणार – रोहित पवार
रोहित पवारांचा खळबळजनक दावा! अजित पवार गटाचे २२ आमदार संपर्कात, पण शरद पवारांकडून मंथन सुरु
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती – अजित पवार गटाच्या १८-१९ आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मात्र शरद पवार त्यातल्या १० ते १२ आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार म्हणाले आहेत. भाजप अजित पवार गटाला फक्त २० जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल असंही रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार की, काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जयंत पाटील विधीमंडळात होते, त्यावेळी अजित पवार गटाचे काही आमदार तिथे जाऊन त्यांना भेटल्याच्या चर्चा होत्या. त्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, ” जयंत पाटील खूप अनुभवी नेते आहेत. त्यामुळे कसं, कधी, कोणतं कार्ड बाहेर काढायचं? हे त्यांना खूप चांगलं माहीत आहे. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे. पुढे बघा काय होतंय. शरद पवार तर, राजकारणात, महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षाही फार पुढे आहेत हे लोकसभा निवडणुकांमध्ये साहेबांनी दाखवून दिलंच आहे. विधानसभेत तर ते आणखी जास्त दाखवतील. त्यामुळे शरद पवार आणि त्यांना जोडीला जयंत पाटील, इतर आमच्यासारखे कार्यकर्त्यांचंही स्वागत आहे. पण ज्या लोकांनी अतिपणा केला. कुठेतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले. अशा लोकांबाबत साहेब आणि जयंत पाटील योग्य निर्णय घेतील, असं वाटतंय.
अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे. आता नेतेदेखील अजित पवारांबाबत खूप बोलतात. पण ते फारसं सकारात्मक नसतं. अशातच आता कार्यकर्त्यांनाही धाडसं आलं आहे अजित पवारांबाबत बोलायला. मग आता हे ठरलंय की, मुद्दाम केलं जातंय. अजित दादांना वेगळं करायचं. सर्व जागांवर अजित दादांना उभं करायचं. पाडण्यासाठी उभं करायचं. शरद पवारांचा पक्ष आहे, त्यांची मतं खाण्यासाठी उभं करायचं. पण आमदार एवढे खुळे नाहीत ना? त्यांनाही माहीत आहे, भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे. त्यामुळे एकतर अजित पवार भाजपसोबत राहिले तर त्यांना २० ते २२ जागा दिल्या जातील. आणि जर ते भाजपसोबत नाही राहिले तर मात्र सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील, पण निवडून मात्र कोणीच येणार नाही. अजित पवारांकडून शरद पवारांकडे किती आमदार येतील? यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “चर्चेत तर अनेक आहेत, पण शरद पवार गटात येणाऱ्या आमदारांचा आकडा हा १८ – २० च्या पुढे आहे. घ्यायचं कोणाला हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील. काही आमदार खूप आधीपासूनच संपर्कात आहेत. त्यांना अनेक वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं जाईल. त्यांच्या नातेवाईकांना अडकवलं जाईल, त्यामुळे काही आमदार तिकडे गेले आहेत. ते आमदार विचाराचे पक्के आहेत, पण भितीपोटी ते तिकडे गेले आहेत, अशा आमदारांचा विचार केला जाईल, असा शरद पवारांच्या स्वभावावरुन मला वाटतोय.
अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण विधानभवनात राष्ट्रवादीच्या पाच ते सहा आमदारांनी गुरुवारी जयंत पाटलांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.