भुशी डॅम दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, धोकादायक पर्यटन स्थळांबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – रविवारी लोणावळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वर्षापर्यटनासाठी पुण्यातून लोणावळ्याला आलेल्या कुटुंबाला भुशी डॅममध्ये जल समाधी मिळाली. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये ९ जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले आहेत. दरम्यान आता या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार आता सर्व जिल्हाधिकारी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढवा घेणार आहेत. पावसाळी पर्यटन सुरक्षित होणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीवन रक्षक तैनात करा, कार्डिक रुग्णवाहिका ठेवा, एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी ठेवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत. मुंबईतील समुद्र किनारे सुरक्षित करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासन अलर्ट मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पर्यटनाचा आनंद घ्या पण आपल्या प्रियजनांचा अनमोल जीव धोक्यात घालू नका, धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.