मुरबाड मतदारसंघावर शिवसेनेच्या दाव्याने शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
बाळ्या मामांच्या विजयाचे महायुतीला हादरे, किसन कथोरेंच्या मुरबाडवर थेट शिवसेनेचा दावा
योगेश पांडे / वार्ताहर
मुरबाड – भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) निवडून आल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता चक्क शिंदेंच्या शिवसेनेने मुरबाड विधानसभेवर आपला दावा सांगितला आहे. नुकत्याच बदलापुरात झालेल्या पदाधिकारी बैठकीत शिवसेनेच्या सर्वच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी मुरबाड मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा सूर लावला आहे. सध्याच्या घडीला मुरबाड मतदारसंघ भाजपकडे असून भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी हा मतदारसंघ बांधून ठेवला आहे. कामाच्या आणि विकासाच्या जोरावर हा मतदारसंघ आपल्याकडेच म्हणजे भाजपकडे ठेवून ते निवडणूक लढतील, अशी चिन्हे असली तरी शिवसेनेच्या मागणीनंतर आता युतीमध्ये या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच होऊ शकते.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा भाग, अंबरनाथ पंचायत समिती, जिल्हा परिषदचे सदस्य तसेच मुरबाड नगर पंचायत आणि कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. याच ताकदीवरून आता शिवसेनेने या मुरबाड मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकारी बैठकीत शिवसेनेची बदलापूर शहर, ग्रामीण भाग आणि मुरबाड तालुक्यात असलेली ताकद पाहता शिवसेनेसाठी हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचा सूर नुकत्याच झालेल्या या बैठकीत उपस्थितांनी लावलाय. दरम्यान आपल्या भाषणात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन यांनी सांगितले की २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत कथोरे यांना शिवसेनेमुळे १ लाख ७४ हजार मतांचा पल्ला गाठता आला, ही काही एकट्या भाजपची मत नव्हती, आम्ही युतीचा धर्म पाळला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मला ५३ हजार मते पडलीत. गोटीराम पवार यांना ५९ हजार मते पडलीत आणि निवडणुकीत कथोरे यांना ८५ हजार मते पडतील. मात्र आता गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार आणि मी शिवसेनेत आहोत, जर मताची गोळाबेरीज केलीत तर ३० ते ३५ हजार मतांनी आम्ही जास्त आहोत, म्हणूनच या मतदारसंघांचे हकदार आहोत, हा मतदार संघ शिवसेना मिळाला हवा, अशीच गर्जना या मेळाव्यात करत वरिष्ठ नेत्यांनाही या मतदार संघ शिवसेनेसाठी सोडवा अशी मागणी करणार आहोत, असे म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान या दाव्यानंतर भाजप आमदार किसन कथोरे काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागेल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या विजयानंतर मुरबाड मतदारसंघात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याच नावाची अधिक चर्चा रंगली होती. कथोरे समर्थक आणि महाविकास आघाडीच्या अनेक समर्थकांनी कथोरे यांचा किंगमेकर म्हणून उल्लेख करत समाज माध्यमांवर स्टेटस, छायाचित्र प्रसारीत केले होते. त्यामुळे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचा विजय झाला असला तरी चर्चा कथोरेंचीच अशी स्थिती असताना शिवसेनेच्या दाव्याने शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.