एकीकडे लक्ष पंतप्रधान मोदी अन् टीम इंडियाच्या भेटीकडे, तिकडे मुकेश अंबानीनी दिल्लीत सोनिया गांधी व राहुल गांधींची घेतली भेट
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – गुरुवार सकाळपासून अवघ्या देशाचे लक्ष भारतात आगमन झालेल्या विश्वविजेत्या टीम इंडियाकडे लागले आहे. काल संध्याकाळी बार्बाडोसवरुन विशेष विमानाने निघालेला भारतीय संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचला. यानंतर भारतीय संघाने दिल्लीतील ७ लोककल्याण मार्ग येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट आटोपून भारतीय संघ मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजययात्रा काढण्यात आली . त्यामुळे गुरुवार सकाळपासून ते संध्याकाळ पर्यन्त तमाम देशवासियांचे लक्ष टीम इंडियावर खिळून राहिले. मात्र, या सगळ्यात दिल्लीत घडलेली एक घडामोड अनेकांच्या लक्षात आली नाही. एरवी अंबानी परिवार हा सामान्य जनता आणि प्रसारमाध्यमांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. मात्र, गुरुवारीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे दिल्लीत आले होते तरी बराचकाळ कोणाला त्याचा पत्ता लागला नाही. मुकेश अंबानी यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ या निवासस्थानी मुकेश अंबानी पोहोचले होते . यावेळी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही त्याठिकाणी उपस्थित असल्याचे कळते. मात्र, दिल्लीत टीम इंडियाचा कौतुक सोहळा आणि त्यानंतर भारतीय संघाची पंतप्रधान मोदींसोबतची भेट या सर्व गदारोळात मुकेश अंबानी दिल्लीत असल्याची माहिती बराचवेळ समोर आली नव्हती.
अखेर मुकेश अंबानी यांची गाडी सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ निवासस्थानावरुन बाहेर पडताना दिसल्यानंतर सगळ्यांना या भेटीबद्दल कळाले. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे येत्या १२ जुलैला लग्न आहे. याच विवाहसोहळ्याचे सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी दिल्लीत आले होते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक आहेत. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळतात. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी पॉपस्टार रिहानाने परफॉर्म केले होते. त्यानंतर आता अनंत अंबानीच्या लग्नात जागतिक ख्यातीचा गायक जस्टिन बीबर परफॉर्म करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जस्टिन बीबर मुंबईत दाखल झाला आहे.