सिद्धिविनायकाच्या चरणी राकांपा ; दर्शन की शक्ति प्रदर्शन? अजित पवार गटाचे साकडं, प्रचाराचाही फोडला नारळ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. सध्या हे सर्व पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने तयारीला लागले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते. यावेळी आगामी विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून बाप्पाला साकडं घालण्यात आलं आहे. ‘येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळू दे’ असं साकडं अजित पवारांसह सर्व आमदारांकडून सिद्धिविनायकाला घालण्यात आले. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते.
राज्यात काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला यश मिळाले नव्हते. त्यातच काल राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. या बैठकीत पक्षाची पुढची वाटचाल कशी असणार आहे, कशा पद्धतीने प्रचार करायला हवा, याबद्दलची रणनिती ठरवण्यात आली. अजित पवार त्यांच्या सर्व आमदारांसह कालच सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार होते. मात्र काल मुंबईतील मुसळधार पावसामुळे आज या सर्व आमदारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसेच येत्या निवडणुकींसाठी बाप्पाला साकडेही घालण्यात आले. मंगळवारी अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याने भाविकांचा मोठा खोळंबा झाल्याच्या पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार आणि प्रफुल्ल तटकरेंनी पूजाही केली.
अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवार देण्यात आले आहेत. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोन जण विधानपरिषदेची निवडणूक लढवताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदारांची फोडाफोडी होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही सर्वजण मिळून सिद्धिविनायकाच्या दर्शनसाठी आलोय. आम्ही सर्वांनी मिळून प्रचाराचा श्रीगणेशा केलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी श्री सिद्धिविनायकाचे पूर्ण पाठबळ आम्हाला मिळेल, हेच आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही इथे आला होतो”, असे सुनील तटकरे म्हणाले. मंगळवार असल्याने आज आम्ही सर्वांनी दर्शन घ्यायचं, असं ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही येऊन दर्शन घेतलं. आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात देवदर्शन करुन करतो. आम्ही आता जनतेच्या समोर जाणार आहोत, त्यासाठी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावे हेच साकडं सिद्धिविनायकाला घातले. आम्ही लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या समोर जाणार आहोत. याची सुरुवात चांगल्या दिवशी केली जाते. तो चांगला दिवस आज नेमका आला आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर दिली.