अखेर वसंत मोरेंचा २३ पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंकडून मोरेंना शिवसेना वाढवण्याची जवाबदारी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित गटात गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी वसंत मोरेंनी शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली. वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वसंत मोरेंसह शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार, याचीही माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली आहे. ती लढाई लोकशाही, संविधान वाचवण्याची होती. आता जी लढाई होईल, ती गद्दारी धोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाची ती लढाई असणार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आज वसंत मोरेंसोबत मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष,१ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.