विधानपरिषद निवडणूक ; भाजपसह महायुतीची अग्नीपरीक्षा; क्रॉस व्होटिंगचा सर्वात मोठा धोका, कुणाचे वाजणार बारा?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – आज होणारी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक ही सत्ताधारी पक्ष भाजपसाठी लिटमस टेस्टपेक्षा कमी नाही. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपसह महायुतीकडून क्राॅस व्होटिंग होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. विधानपरिषद निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या पसंतीची २३ मते असणार आहेत. अशा स्थितीत प्रत्येक पक्ष २३ चा कोटा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे १०३ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार) ४०आमदार आहेत. शिवसेनेचे (एकनाथ शिदें) ३८ आमदार आहेत. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या महायुतीला १० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. महायुतीला ११ पैकी १० जागा जिंकणे सोपे आहे, परंतु क्रॉस व्होटिंग झाले तर तीन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. शरद पवार यांच्याकडे १२आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे १६ तर काँग्रेसकडे ३८ आमदार आहेत. या १२ उमेदवारांपैकी भाजपचे पाच उमेदवार सुरक्षित वाटतात, ते म्हणजे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर. महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा १ उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव सहज विजयी होऊ शकतात. जयंत पाटील यांना जिंकायचे असेल तर त्यांच्यासाठी मतांचे व्यवस्थापन करावे लागेल.
क्रॉस व्होटिंगचा सर्वात मोठा धोका राष्ट्रवादीच्या आमदाराकडून (अजित पवार) वर्तवला जात असून लोकसभा निवडणूक झाल्यापासून अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास त्याचा बदल आगामी विधानसभा निवडणुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. १२ उमेदवार रिंगणात आहेत. मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत महायुती वरचढ आहे. महायुतीला ११ पैकी ९ जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या वातावरणात शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार पक्ष बदलतील हे नाकारता येणार नाही. तसे झाल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.
तर समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमचे एकूण ३ आमदार आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी महाविकास आघाडीला साथ दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता आणखी वाढणार आहे. मात्र, एआयएमआयएमची रणनीती अद्याप स्पष्ट झालेली नाही. याशिवाय बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे एकूण ६ आमदार आहेत. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि विरोध याचा परिणाम महाविकास आघाडीच्या विजयावर होऊ शकतो.