विधानपरिषद निवडणुकीत अजित दादांकडून मवीआला धक्का, महायुतीचे ९ तर मविआचे २ उमेदवार विजयी, मविआचे जयंत पाटलांचा परभव
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – विधानपरिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल शुक्रवारी हाती आला. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यामुळे, कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यामध्ये, भाजपकडे संख्याबळ असल्याने भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजप नेत्यांना होता. तर, महायुती म्हणूनही आमचे सर्वच ९ उमेदवार जिंकतील, असा दावाही भाजपच्या नेत्यांकडून केला जात होता. भाजपसह महायुतीच्या नेत्यांनाही या विजयाचा विश्वास होता. त्यानुसार, महायुतीच्या सर्वच ९ उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उभे असलेल्या १२ उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची ८ मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून आला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला.
विधानपरिषदेच्या ११ विजयी उमेदवारांमध्ये भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे,परिणय फुके, अमित गोरखे,सदाभाऊ खोत, शिंदे गटाचे भावना गवळी, कृपाल तुमाने, अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे. दूसरी कडे महाविकास आघाड़ी कडून कांग्रेसच्या प्रज्ञा सातव तर शिवसेना उद्धव गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडत होती. मात्र, त्यांच्या उमेदवारांना ती मतं मिळाली असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे सेनेचे दोन उमेदवार रिंगणात होते. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने तेही सुस्थितीत होते, त्यांचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे १५ आमदार सभागृहात होते. त्यामुळे, जयंत पाटील यांच्याकडे १६ मते होती. जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी ७ मतांची जुळवाजुळव करावी लागणार होती. पण, त्यांना ७ मतांची जुळवाजुळव करणे शक्य झालं नसल्याचं दिसून आलं. अजित पवार गटाचे ३९ आमदार सभागृहात आहेत. त्यांना आणखी ७ मते हवी होती. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील ३ मतांच्या भरवशावर त्यांचे गणित अखेर जुळले. तर, उद्धव ठाकरे सेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांच्या मिलिंद नार्वेकरांना आणखी ८ मते हवी होती. निवडणूक निकालानंतर त्यांना ही मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.