विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसशी गद्दारी, फुटलेले त्या ७ आमदारांची यादी आली समोर
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंची क्लोजर रिपोर्ट दिल्लीत; आमदारांवर काँग्रेस हाय कमांड लवकरच कारवाई करणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई– विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ७ आमदार फुटल्याची माहिती आहे. त्यात विदर्भातील १ मराठवाडातील ३ आमदार, उत्तर महाराष्ट्रातील २ आमदार तर एक मुंबईतील १ आमदार फुटला असल्याची सूत्रांची माहिती. या आमदारांवर काँग्रेस हाय कमांड लवकरच कारवाई करणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन देणार आहे. काँग्रेस हाय कमांडकडे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची शिफारस ही नाना पटोले करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फुटलेल्या आमदारांच्या नावात झिशान सिद्दीकी,सुलभा खोडके,शिरीष चौधरी,हिरामण खोसकर,जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे यांचा समावेश आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसची जवळपास सात मतं फुटल्याच्या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मते फुटल्याची कबुलीच महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसकडून शुक्रवारी रात्रीच दिल्लीला अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल या आमदारांवर कारवाई करण्याची शिफारस महाराष्ट्र काँग्रेसने अहवालात केल्याचे कळते. विधान परिषदेच्या ११ जागांवर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीकडे पुरसे संख्याबळ असतानाही त्यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीतील आमदारांची मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून आघाडीत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या जवळपास आठ आमदारांची मते फुटल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन काही आमदारांनी पक्षाशी बेईमानी केल्याचा आरोप केला आहे. या आठ आमदारांमध्ये झिशान सिद्दिकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर आणि मोहन हंबिर्डे या आमदारांचा समावेश असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जाते.
या संदर्भात नाना पटोले यांनी पत्रकारांना माहिती दिली. ‘चंद्रकांत हंडोरे ज्या वेळी निवडणुकीला उभे होते, त्या वेळीही हा प्रकार झाला होता. त्या वेळी या आमदारांनीच मते फिरवल्याचे स्पष्ट होत नव्हते. म्हणूनच आम्ही त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी काही निर्णय घेतले. त्यात हे गद्दार सापडले आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना कळविलेले आहे. लवकरच पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दार आमदारांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल,’ असे पटोले म्हणाले. ‘लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले, महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेइमान आम्हाला शोधून काढायचे होते, म्हणूनच काँग्रेसने विधान परिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल. कालच्या निकालानंतर ‘घरचे भेदी’ शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल देण्यात आला आहे, दोषींवर कारवाई होईल,’ असे वडेट्टीवार म्हणाले. आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘क्रॉस वोटिंग’ केल्याच्या बातम्या येत आहे; पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे. आमदार गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत, त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.