उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ?
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिल्यानंतर सात सहकारी कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल; याचिकेवर २५ जुलैला सुनावणी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेतच. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती, त्याला आता नव्याने आव्हान देण्यात आलं आहे. सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादक करण्यात आली आहे. या याचिकेवर २५ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यामध्ये अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या ८० संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयान याविरोधात निषेध याचिका दाखल केली आहे. या निषेध याचिकेवर २५ जुलैला न्यायालयान सुनावणी होणार आहे.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मर्षी विखे-पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जुलैला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं सप्टेंबर २०२० मध्ये शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. पण, न्यायालयाने तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नव्हता. मूळ याचिकाकर्त्याने या क्लोजर रिपोर्टला विरोध केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं स्वत:हूनच आपण या प्रकरणाचा तपास करु, असं न्यायालयाला सांगितलं होतं. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट दिली होती.