ठाणे जिल्ह्यात महायुतीत वाद पेटला; भाजपचा दबावतंत्र कायम
कोपरी-पाचपाखाडीतून भाजपकडून उमेदवार देण्याची तयारी; शिंदे सेनेत धुसफुस सुरु
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच महायुतीमध्ये कुरघोड्यांचं राजकारण सुरु झालं आहे. कल्याण पूर्व, ठाण्यातील जागांवरुन शिंदेसेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. कल्याण पूर्व, ठाण्याच्या जागेसाठी भाजपनं उमेदवार दिले आहेत. त्यांच्याविरोधात शिंदेसेनेत नाराजी आहे. बंडखोरीची तयारी सुरु आहे. याची कुणकुण लागलेल्या भाजपनंही मित्रपक्षाला शह देण्याची तयारी सुरु केली आहे. कोपरी-पाचपाखाडीतून भाजप उमेदवार देईल, असा थेट इशारा भाजपकडून देण्यात आलेला आहे. कोपरी-पाचपाखाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कल्याण पूर्वमधून भाजपनं सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्या विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत. गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदेसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यात महेश गायकवाड जखमी झाले होते. तेव्हापासून शिंदेसेना आणि भाजपचे संबंध विकोपाला गेले आहेत. आता सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे शिंदेसेनेत नाराजी आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघातून भाजपनं विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा संधी दिली आहे. इथून मनसेनं अविनाश जाधव यांना तिकीट दिलेलं आहे. या मतदारसंघासाठी शिंदेसेना आग्रही होती. पण विद्यमान आमदार भाजपचा असल्यानं महायुतीमधील मोठ्या भावानं इथे उमेदवार दिला. त्यामुळे नाराज झालेले शिंदेसेनेचे संजय भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज नेलेला आहे. त्यामुळेही उलटसुलट चर्चा सुरु आहेत. यानंतर भाजपनंही आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघावरच दावा ठोकला. लोकसभा निवडणुकीत भाजपनं ठाणे मतदारसंघाची मागणी करत पालघरची जागा सोडवून घेतली होती. आता तसंच दबावतंत्र पुन्हा एकदा वापरलं जातंय का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. एकमेकांच्या मतदारसंघांवरुन दावे करुन भाजप, शिंदेसेना नेमकं काय साधणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.