भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक, देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा दगड दोघांना लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी सोमवारी प्रचाराला सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री त्यांचा प्रचार गोवंडी परिसरात सुरू असताना अचानक एक दगड प्रचारातील रथावर येऊन पडला. हा दगड तक्रारदार निहारिका खोदले – ५४ यांना लागला. पुढे तोच दगड कलप्पा गुनाळे यांच्या उजव्या गालाला लागला. त्यानुसार खोदले यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३३७, ३३६ अंतर्गत व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात देवनार पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.
गोवंडी येथील न्यू गौतम नगर परिसरात सोमवारी सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर खोदले यांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी मध्यरात्री याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसी टीटीव्हीच्या मदतीने याप्रकरणी तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.