काँग्रेसच्या पंजावर मनसेचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता काँग्रेसच्या पंजा चिन्हावर आक्षेप घेतलाय. चिन्हामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील बोधचिन्हात देखील पंजा असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक टावरे यांनी ही तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या ‘पंजा’ या चिन्हावरून आता मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यउपाध्यक्ष अशोक टावरे यांनी केली आहे.
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे ही तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान या तक्रारीवर तात्काळ निर्णय न झाल्यास या चिन्हाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा, अशोक टावरे यांनी दिला आहे. दरम्यान, अगोदरच राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हांचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. विरोधी पक्षांमध्ये अससेल्या पक्षांमध्ये राज्यात फक्त काँग्रेसकडे त्यांचं आधीपासूनचं चिन्ह आहे. शिनसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला वेगवेळी चिन्हे देण्यात आलीत. त्यामुळे आता निवडणूक आयोग दाखल तक्रारीनुसार यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.